18 July, 2010

वारसा टिळकांचा!




गुरुवार, ८ जुलै २०१०फ्रान्समध्ये मार्सेलिस बंदराजवळ ‘मोरिया’ बोटीवरून विनायक दामोदर सावरकर या तरुणाने समुद्रात मारलेल्या त्या इतिहासप्रसिद्ध उडीची आज शताब्दी होत आहे. अर्थातच त्यानिमित्ताने अनेक ऐतिहासिक गोष्टींची उजळणी केली जाणे स्वाभाविक आहे. ज्या काळात सावरकर पुण्यात शिकत होते, त्या काळावर एका तीनअक्षरी महामंत्राचा ठसा होता. तो मंत्र अर्थातच ‘टिळक’ या नावाने सर्वतोमुखी होता. वातावरण स्वातंत्र्याच्या आशाआकांक्षांनी आणि अत्युच्च अशा प्रेरणेने भारावलेले होते. पुणे शहरात फग्र्युसन महाविद्यालयात शिकणारे सावरकर हेही तरुणांमध्ये वक्तृत्वाचे अचाट आकर्षण ठरू लागले होते. बंगालच्या फाळणीने सर्व समाजात संतापाची लाट उसळली होती. त्यातच टिळकांनी परदेशी मालावर बहिष्कार टाकायची हाक दिली. १ ऑक्टोबर १९०५ रोजी भरलेल्या सभेत सावरकरांनी परदेशी मालाच्या होळय़ा पेटवायची भाषा उच्चारली. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी न. चिं. केळकर हे होते. त्यांनी परदेशी मालाच्या होळय़ा पेटवण्यापेक्षा त्या कपडय़ांना गोरगरिबांमध्ये वाटून टाकायची मागणी केली. हा त्या तरुणांना एका अर्थाने टाकण्यात आलेला पेच होता. त्या दिवशी टिळक पुण्यात नव्हते. तरुणांनी टिळकांना आपले साकडे घातले. टिळकांनी त्यांना सांगितले, की मी विलायती कपडे जाळायला परवानगी देईन, पण तुम्हाला ढिगावारी कपडे जाळता आले पाहिजेत. सावरकरांना हे आव्हान होते. त्यांनी ते स्वीकारले आणि अतिप्रचंड ढीग करून कपडे जाळायची घोषणा केली. ७ ऑक्टोबर १९०५ रोजी पुण्यात विलायती कपडय़ांनी भरलेल्या गाडीची मिरवणूक निघाली. तेव्हाच्या रे मार्केटवरून (आताची महात्मा फुले मंडई) ती तेव्हाच्या लकडी पुलाच्या (आताचा संभाजी पूल) पलीकडे मोकळय़ा मैदानात पोहोचली. या मिरवणुकीत स्वत: टिळकांनी भाग घेतला होता. होळी एकीकडे, तर सभा दुसरीकडे व्हावी अशी सूचना टिळकांनी केली. टिळकांच्या नावाचा दबदबाच एवढा होता, की त्यांना तोंडावर विरोध करायला कुणी धजावत नसे. सावरकरांनी म्हटले, की मग इथपर्यंत तरी आम्ही कशासाठी आलो, त्यापेक्षा मार्केटातच कपडे नसते का जाळता आले? टिळक हे स्वभावत:च लोकशाही मार्गाने जाऊ इच्छिणारे आणि तरुणांच्या विचारांची कदर करणारे! त्यांनी त्या ठिकाणी एवढे प्रखर भाषण केले, की त्या तरुणांमध्ये चैतन्याचे स्फुल्लिंग चेतवले गेले. त्यावर कडी केली ती शिवरामपंत परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण भाषणाने! परदेशी कपडय़ांच्या होळीने हा इतिहास घडवला. ती परदेशी कपडय़ांची देशातली पहिली होळी ठरली. रँग्लर र. पु. परांजपे हे तेव्हा फग्र्युसनचे प्राचार्य होते. त्यांनी सावरकरांची फग्र्युसनच्या वसतिगृहातून हकालपट्टी केली आणि त्यांना दहा रुपये दंड केला. टिळकांना ती ठिणगी पुरेशी होती. त्यांनी तिचे आणखी एका आगीत रूपांतर कसे होईल ते पाहिले. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ या शीर्षकाने त्यांनी ‘केसरी’त अग्रलेख लिहून परांजपे यांच्यावर कडाडून टीका केली. (१७ ऑक्टोबर १९०५) त्यानंतरचे दोन आठवडे टीकेचा हा क्रम त्यांनी चढाच ठेवला होता. सावरकरांचा जन्म १८८३चा आणि टिळकांचा १८५६चा! म्हणजे टिळक त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी मोठे होते. युरोपात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे शिष्यवृत्ती देतात, हे टिळकांनी सावरकरांच्या कानावर घातले आणि सावरकर त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून तिकडे रवाना झाले, इथपर्यंत टिळक आणि सावरकर यांचे गुरू-शिष्याचे नाते जोडले गेले होते. सावरकरांनी श्यामजी वर्माची मर्जी एवढी संपादन केली होती, की त्यांनी इंडिया हाऊसची जबाबदारी सावरकरांवर सोपवून १९०७ मध्ये पॅरिसकडे प्रयाण केले होते. याच काळात टिळकांचे आणखी एक शिष्य सेनापती बापट यांनी लंडनमध्ये बॉम्ब बनवायचे शिक्षण तर घेतलेच, पण त्याच्या कृतीच्या पुस्तिका भारतात पाठवून दिल्या. याच काळात महमद अली जीना यांनी टिळकांचे शिष्यत्व स्वीकारले होते. राजद्रोहाच्या खटल्यात त्यांच्या जामीनकीच्या अर्जावर जीनांनी केलेला युक्तिवाद इतिहासात अजरामर ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले महात्मा गांधीजी हेही टिळकांना गुरू मानत. प्रत्यक्षात जरी त्यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्यत्व स्वीकारले असले तरी टिळकांना तेही आपले गुरु मानत. गांधीवादी असणारे आचार्य विनोबा भावे हेही टिळकांचे शिष्य होते. पुढे मीरत खटल्यामध्ये ज्यांचा सहभाग होता ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे तर टिळकांचे शिष्यत्व हे आपले भूषण मानत. थोडक्यात त्या काळच्या सर्व लहानथोर नेत्यांवर टिळक या नावाची मोहिनी होती. सावरकर यांची ती इतिहासप्रसिद्ध उडी ठरली तेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहीत होते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या हालअपेष्टांची चर्चा नेहमीच केली जाते, अंदमानात सावरकरांना फिरवाव्या लागलेल्या कोलूचे कष्ट अपरंपार होते. ‘हातीचा घास कधी हटुनि रहावा’, अशी ती अवस्था होती. टिळकांना सोसाव्या लागलेल्या कडक शिक्षेची चर्चा त्या मानाने कमी होते. टिळकांना त्या काळात जडलेल्या व्याधींचे मूळ तिथल्या त्यांच्या शिक्षेत आहे. कल्पना करा, की पाण्यात कडक अशी जाडजूड भाकरी बुडवून खायचा आपल्यापैकी कुणावर प्रसंग आला आहे. टिळकांची त्याबद्दल तक्रार मुळीच नव्हती. हे आत्मिक बळ त्यांच्या अंगी आले ते त्यांनी आपले मन त्या लेखनात गुंतवले होते त्यामुळे! पंडित नेहरूंनी टिळकांविषयी म्हटले आहे, की त्या काळात फारच थोडय़ा व्यक्तींना अविवाद्य असे समाजमनात स्थान लाभले होते, त्यात टिळकांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर होते. ज्या लढय़ाशी गांधीजींचे नाव जोडले गेले आणि ते अजरामर झाले, त्या दक्षिण आफ्रिकेतल्या लढय़ाला सावरकरांनी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमधल्या सभेत पाठिंबा देऊन तिथल्या हिंदी जनतेच्या हालअपेष्टांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सावरकरांना फेरअटक करून भारतात आणण्यात आले आणि पुढे अंदमानात त्यांची रवानगी करण्यात आली तेव्हा ती खबर टिळकांना तातडीने कळवायची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस त्यांना पत्राद्वारे ही माहिती द्यायचे आणि वर्षांतून एकदा काही मिनिटे होणाऱ्या भेटीत इतिवृत्त कथन करायचे, तेव्हाच त्यांना या घडामोडी कळून येत असत. १९१८ मध्ये सावरकर अंदमानात आजारी पडले, पण त्यांच्या सुटकेविषयी कोणतीही हालचाल झाली नव्हती. टिळकांचे ३१ जुलै १९२०च्या मध्यरात्रीनंतर निधन झाले, तेव्हाही सावरकरांना त्याची गंधवार्ता तात्काळ कळणेही अशक्य होते. मे १९२१ मध्ये सावरकरांना महाराजा बोटीने स्वदेशी आणण्यात आले तरी त्यांची रत्नागिरीच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पुढे १९२४ मध्ये किमान पाच वर्षे राजकारणात भाग न घ्यायच्या अटीवर त्यांची सुटका झाली. ‘माफी मागून तुम्ही सुटका करवून घ्यावी’, असे टिळकांना सुचवण्यात आले असता त्यांनी त्यास स्वच्छ शब्दांत नकार तर दिलाच होता, पण त्यापेक्षा आपण मरण पत्करू असे ते म्हणाले होते. त्यांनी आपल्या प्रतिनिधींना तसे सुचवू देण्यासही मज्जाव केला होता. परिस्थिती भिन्न होती, मनोनिग्रह त्याहून भिन्न होता. टिळकांना सर्वव्यापी शिष्यवर्ग का लाभला, याचे मूळ त्यांच्या या ठाम विचारांमध्ये सापडते. सावरकरांचा तुरुंगवास चालू होता, तेव्हाच म्हणजे १९१५मध्ये हिंदूमहासभेची स्थापना झाली होती. पुढे दहा वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हिंदूमहासभेचा उदय झाला तेव्हा मंडालेहून सुटका होऊन आलेले टिळक काँग्रेसमध्ये परतले होते, इतकेच नव्हे तर त्यांनी काँग्रेसच्या कामात स्वत:चे सर्वस्व अर्पण केले होते. हिंदूमहासभेची स्थापना मुस्लिमांच्या विरोधात होती, पण त्या स्थापनेनंतर एकाच वर्षांने टिळकांनी मुस्लिमांना मतदारसंघप्रधान योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी लखनौ करार घडवून आणला (१९१६). टिळक आणि जीना हे त्या कराराचे खंदे समर्थक होते. मुस्लिम लीगला काँग्रेसने दिलेले ते उत्तर होते. हसरत मोहानी यांच्यासारखा शायर तर टिळकांच्या प्रेमातच पडला होता. हा इतिहास सावरकरांच्या त्या इतिहासप्रसिद्ध उडीच्या निमित्ताने चितारताना त्या काळाचे स्मरण करणे हा तर उद्देश आहेच, पण याच पानावर त्यांच्या अफाट अशा कर्तृत्वाचे शिल्प चितारले गेले आहे त्याचे बलस्थान टिळकांच्या या वारशामध्ये होते. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतीकारक होते, पण त्यांचे क्रांतीवीरत्व टिळकांकडे होते.
(दैनिक लोकसत्ता )