28 May, 2014

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे काय माहिती आहे? सावरकर म्हणजे साक्षात धगधगते यज्ञकुंड. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर पेटलेले अग्निकुंडच उभे राहते, त्यांच्या लिहिलेल्या रचना स्मरतात आणि त्या रचनेतील प्रत्येक शब्द त्या यज्ञकुंडात पेटलेल्या ज्वाळे सारखे मनात धगधगत राहतात
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाहल त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। ।।
त्यांना भिऊन पळू इच्छिणाऱ्या कालसार्पाच्या फण्यावर तात्याराव सावरकर नामक मृत्युंजय नेहमीच तांडव करताना दिसतो. मृत्यूला भ्याड म्हणणारे,  “हे मृत्यू ज्या प्रमाणे शंकराने हलाहल विष प्राशन केले तद्वत तुला तुझ्या सैन्यासकट गिळून जिरवून दाखवेल!” असे उलट मृत्युलाच आव्हान देणारा हा अवलिया विरळाच होय. सावरकरांचा प्रत्येक शब्द म्हणजे वेदच. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळीत साक्षात सरस्वती आणि रणचंडिका उभयता एकाच वेळी वास करतात. त्यांच्या घरात असलेल्या अष्ट्भुजा देवीलाही हे ज्ञात आहेजेव्हा बाल विनायक तिच्या समोर बसून प्रतिज्ञा घेत होता कि "हे माते, या माझ्या परमपुज्य मातृभूमीला परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून, शत्रूला मारिता मारिता मरेतो झुंजेन!" तेव्हा तिच्याही मुठी कदचीत वळल्या असतील.  तात्यारावांचे केवळ वक्तृत्वच नव्हे तर कर्तृत्वही राष्ट्रकार्यार्थ मातृभूमी चरणी वाहिले होते. १९०५ साली पुण्यात त्यांनी एक पराक्रम केला. त्यांनी परदेशी कापडाची अवघ्या पुण्यातून वाजत गाजत मिरवणूक काढली आणि शेवटी मुठा नदी काठी त्या कापडाची होळी केली. इंग्रज सरकारला उघड उघड जहाल विरोध करण्याचे धाडस प्रथमच दाखवले गेले. (ह्या परदेशी कापडाच्या होळीची त्या वेळी मवाळ आणि स्वयंघोषित अहिंसावाद्यांनी अवहेलना केली होती पण त्यांनीच १९२० च्या सुमारास त्यांनीही हेच धोरण अवलंबले आणि १९०५ सालच्या या तथाकथित हिंसक घटनेला १९२० अहिंसक मानण्यात आले.)
      पुढे लोकमान्य टिळकांनी त्यांना इंग्लंडला जाऊन तेथे क्रांतिकार्याची सुरुवात करावी असा सल्ला दिला त्यासाठी इंग्लंडस्थित श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिवाजी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. सावरकर कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्लंडला निघाले. पण त्या काळी असा कोणी विद्यार्थी जर इंग्लंडला जात असेल तर त्याला दोन प्रतिष्ठित लोकांचीसहि असलेले हमी पत्र लागत असे. लोकमान्य टिळकांनी एक सही केली आणि दुसरी सही कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी केली. इंग्लंड मध्ये इंडिया हाउस मध्ये ते वास्तव्यास होते. एक महत्वाची गोष्टीचा उल्लेख करणे इथे आवश्यक वाटते, सावरकर इंग्लंडला गेले २६ मे १९०६ साली आणि त्यांना अटक करून भारतात आणले जून १९१० साली म्हणजेच सावरकरांचे इंग्लंड मधील वास्तव्य अवघे साडे तीन ते चार वर्षांचे होते पण भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा जर आपण अभ्यास केला तर १९१० नंतर भातात घडलेल्या सर्व क्रांतिकारक पुरस्कृत घटनांचा संबंध कुठेतरी सावरकरांच्या या इंग्लंड मधील साडे तीन ते चार वर्षांशी जुळून येतो. उदाहरणच द्यायचे झाले तर नाशिकमध्ये अनंत कान्हेरेने जाक्सनला ज्या पिस्तुलाने गोळ्या घातल्या ते पिस्तुल सावरकरांनी इंग्लंड वरून पाठविलेले पिस्तुल आहे असा इंग्रजांचा संशय होता. इंग्लंड मध्ये त्यांनी ३ पुस्तके लिहिली. इटलीचा क्रांतिकारक जोसेफ माझिनी, १८५७ चे स्वातंत्र्य समर आणि शिखांचा इतिहास (पैकी शिखांचा इतिहास या ग्रंथाची मूळ प्रत हरवली असे म्हणतात).  १८५७ साली भारतात झालेली क्रांती म्हणजे केवळ सैनिकांचे बंद नसून ती एक पूर्व नियोजित क्रांती आहे असे छातीठोकपणे सांगणारे सावरकर हे पहिले व्यक्ती होय. तत्कालीन इंग्रज सरकारने तर या ग्रंथाची एव्हढी धास्ती घेतली कि त्या पुस्तकावर प्रकाशनापूर्वीच बंदी घालण्यात आली. जगाच्या इतिहासात या पूर्वी कधीही कोणत्याही पुस्तकावर प्रकाशनापूर्वी बंदी कधीच घातली नव्हती. हा ग्रंथ  इंग्लंडहून छुप्या मार्गाने युरोपात आणण्यात आला आणि तिथे १९०९ साली  या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सावरकरांच्या या ग्रंथाने क्रांतीकारकांना अक्षरशः मोहिनी घातली होती. भारतातील जवळपास सर्वच भाषेत या ग्रंथाचे भाषांतर  झाले. सावरकरांनी इंग्लंड येथे काही रशियन मित्रांकडून बॉम्ब बनवण्याचे कसब शिकून घेतले. भारत भवन मध्येच छोटीशी प्रयोगशाळा उभी करून तिथे दोन बॉम्ब तयार करून पहिले. त्यापैकी एक बॉम्ब आणि काही पिस्तुले भारत भवनाचा आचारी चतुर्भुज याच्या हस्ते भारतात पाठवण्यात आली. मधल्या काळात भारतात इंग्रजांनी क्रांतीकारकांची धरपकड सुरू केली. जाक्सन खून प्रकरणात वापरलेले पिस्तुल हे सावरकरांनी इंग्लंड वरून पाठवले आहे असा संशय ठेऊन इंग्रजांनी सावरकरांना १९१० साली इंग्लंड मध्ये अटक केली.
      त्यांना कैद करून भारतात आणत असताना एक नाट्यमय प्रसंग घडला. तो घडला  म्हणण्यापेक्षा  नियोजन बद्ध आणि जाणीवपूर्वक घडविण्यात आला असे सांगणे अधिक संयुक्तिक ठरेल. सावरकरांना मोरेआ नावाच्या जहाजातून  भारतात आणण्यासाठी १ जुलै १९१० रोजी इंग्लंड येथून निघाले. हे जहाज ८ जुलै १९१० रोजी फ्रांसच्या मार्सेलिस बंदराजवळ असताना सावरकरांनी जहाजाच्या एक छोट्या खिडकीतून समुद्रात उडी मारली आणि पोहत पोहत फ्रांस च्या किनार्यावर गेले . आंतरराष्ट्रीय नियमांनुसार इंग्रज सावरकरांना अटक करू शकत नव्हते. मादाम कामा आणि आचार्य  यांच्या मदतीने ते त्या किनाऱ्यावरून सावरकर हे त्या मार्सेलिस च्या किनाऱ्यावर इंग्रजांच्या देखत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त होणार असा एक धाडसी बेत आखला गेला होता. पण दुर्दैवाने सावरकरांना मदत मिळण्यापूर्वीच अटक करण्यात आली. वर वर पाहता अपयशी ठरलेली सावरकरांची हि खेळी मात्र यशस्वी झाली होती. हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात इंग्लंड विरुद्ध खटला उभा राहिला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सावरकरांनी आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त करून दिले. इकडे भारतात मात्र सावरकरांना न भूतो न भविष्यति अश्या ५० वर्ष्यांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
सावरकरांच्या हजरजबाबीपणाचेही खूप किस्से ऐकायला मिळतात. याच खटल्याच्या संदर्भात असाच एक किस्सा ऐकण्यात आला. ५० वर्ष्यांची शिक्षा सुनावल्यावर तो (अ)न्यायाधीश अतिशय कुत्सितपणे तात्यारावांना म्हणाला "इंग्रज सरकार दयाळू आहे ते तुम्हाला ५० वर्षांनी म्हणजेच २४ डिसेम्बर १९६० साली नक्की तुरुंगातून सोडेल! " तात्यारावही क्षणाचाही विलंब न करता बोलले "ते सारे ठीक आहे हो, पण तुम्हाला खरेच याची खात्री आहे का की इंग्रज भारतावर १९६० सालापर्यंत राज्य करतील?"
      सावरकरांनी स्वतःच्या वाहिनीला एका पत्रात म्हणाले होते
'कि घेतले व्रत हे न आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने
जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे
बुद्ध्याची वान धरिले करी हे सतीचे!'

(स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवनपाटाचा हा पूर्वार्ध आहे, राष्ट्राक्रांती पर्व आहे. २४ डिसेंबर १९१० ते मे १९२१ हे अंदमान पर्व तर  १९२१ ते २६ फेब्रुवारी १९६६ समाजक्रांती पर्व आहे. उर्वरित पर्व पुढील लेखात!!!)

No comments:

Post a Comment