19 April, 2014

इतिहास विज्ञानाचा!!!!!


आपण सर्वच भविष्यावर नजर ठेऊन, तो अधिक सुखकर व्हावा म्हणून वर्तमानाशी सर्वतोपरी झुंजत असतो. पण त्यासाठी सर्वात उपयोगी ठरते ती भूतकाळाची धगधगती मशाल. हीच मशाल आपल्याला पूर्वी घडून गेलेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्यापासून परावृत्त करते. भारतीय इतिहासातील एका महत्वाच्या कालखंडातील काही घटनांचा अभ्यास करण्याच्या हेतूने मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले इटलीच्या एका क्रांतिकारकाचे जीवन चरित्र "जोसेफ मॅझिनी" वाचत होतो. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील सुरवातीचा  भाग हा इतिहासच्या अभ्यासाचे महत्व सांगणारा आहे. मला वाटते कि कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकाची अथवा लेखाची याहून चांगली सुरुवात असूच शकत नाही
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणतात, “प्रत्यॆक मनुष्य मागच्या इतिहासाचा नि अनुभवाचा फायदा घेता मनुष्यजातीने आरंभी केलेल्या चुका पुन्हा करू लागल्यास मानवी उत्क्रांती खुंटली, असेच म्हणावे लागेल. मनुष्यजातीने जे प्रश्न सोडवून ठेवले आहेत ते पुन्हा सोडविण्यात काल व्यर्थ घालवण्यापेक्षा त्या प्रश्नांची कालदेशांनी अमर्यादित अशी उत्तरे जी अनेक तत्ववेत्त्यांनी सिद्धांतरूपाने ग्रथित केलेली आहेत. ती समजावून घेऊन ज्या प्रश्नांची उत्तरे मनुष्यजातीला अजून मिळाली नाहीत ते प्रश्न सोडविण्यात तो काल घालवणे हेच श्रेयास्कार आहे.’ {जोसेफ मॅझिनी, (लेखक- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर) मधून साभार}



विज्ञानाचा अभ्यास करण्या पूर्वी आपणही त्याचा इतिहास आणि काळानुरूप एखाद्या संकल्पनेत होणारे बदल यांचा अभ्यास केला पाहिजे. निसर्गात घडणाऱ्या असंख्य घटनांचे मानवास नेहमीच मोठे कुतूहल राहिले आहे. त्या घटनांच्या मागील कारक भाव समजून घेण्याचा प्रयत्न माणूस करू लागला. मनुष्याच्या आंतरमनात दडलेले हे कुतूहल आणि जिज्ञासू भावना हीच विज्ञानाच्या आणि पर्यायाने मनुष्याच्या उत्क्रांतीस कारणीभूत आहे. या घटनांचे मनुष्य निरीक्षण करू लागला आणि त्यावर आधारित त्याचे निष्कर्ष काढू लागला. त्याला दिसणाऱ्या घटनांचे त्याने वर्गीकरण करायला सुरुवात केली. काही घटनांची एका विशिष्ट कालावधी नंतर पुनरावृत्ती होत असल्याचे मानवाच्या लक्षात आले. उदाहरणार्थ  रोजच दिसणारा सूर्योदय आणि त्यानंतर ठराविक काळाने होणारा सूर्यास्तरोजच आकार बदलणारा चंद्र. पोर्णिमा, अमावस्या यांचे कारक भाव माहित नसले तरी एका ठराविक अवधी नंतर या घटना घडतात हे मानवाला कळू लागले होते. समुद्रकिनारी राहणाऱ्या मानवास भारती ओहोटी हि देखील अशीच ठराविक काळानंतर होणारी नित्य, अखंड, शाश्वत गोष्ट आहे हे देखील कळले. काही घटना मात्र  कोणत्याही या काळाच्या बंधनात बसण्यासारख्या नव्हत्या. उदाहरणार्थ जंगलात वानवा पेटणे, विजा चमकणे, वारा वाहने इत्यादी
या घटनांची सुरुवात झाली कधी? कशी झालीया घटनांच्या मागे काय प्रयोजन असेल? या घटनांचा कर्ता कोण असेल? या प्रश्नांचे उत्तर काही केल्या मानवास मिळत नव्हते. या घटनांमागील कारक भाव समजून घेताना मनुष्याने याचे उत्तर दोन प्रकारे देण्याचा प्रयत्न केला. मानवाने एक सिद्धांत मांडला त्या नुसार निसर्गातील प्रत्येक घटना हि एक शक्ती नियंत्रित करीत आहे. आश्चर्यकारकरित्या या पृथ्वीच्या पाठीवर सर्वदूर पसरलेल्या मनुष्य जातीने वेगवेगळ्या स्थळी आणि कदाचित भिन्न कालावधीत हाच सिद्धांत मांडला आणि केवळ एव्हढेच नव्हे तर आपल्यावर कोणतेही नैसर्गिक संकट येउ नये म्हणून त्या शक्तीची आराधना हि सुरु केली. या शक्तीची पूजा-अर्चना केली तर हि शक्ती आपले जीवन अधिक सुसह्य करेन अशी आशा या भूपृष्ठावर तुटक तुटकपणे पसरलेल्या प्रत्येक मनुष्य प्रजातीस होती हि देखील एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. मात्र ह्या नियंत्रण करणाऱ्या शक्तीचे वर्णन या सर्व भूतलावर विखुरलेल्या मनुष्य प्रजातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारात केले गेले, एव्हढेच नव्हे तर या शक्तीची पूजा-अर्चना करण्याच्याही भिन्न पद्धती आहेत. आज आपण मनात असलेला परमेश्वर, अल्लाह वगैरे ह्याच सिद्धांताचे उदाहरण आहे.
            एका दृष्टीने पाहायला गेले तर हा सिद्धांत अशास्त्रीय आहे. पण माझ्या मते हा विश्वातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा शास्त्रीय सिद्धांत आहे. निसर्गात घडणारी कोणतीही घटना हि अकारण होत नाही. त्या मागे एक कारण आहे हे मनुष्यास मान्य आहे हे सिद्ध करणारा हा सिद्धांत आहे. मानवीय इतिहासाच्या कारकिर्दीत विज्ञानच्या युगाकडे जाणारी हि प्रथम पायरीच म्हणवी लागेल. कारण या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवर मानवाने विज्ञानास अतिशय आवश्यक असलेले 'कुतूहल (जिज्ञासा)', त्यासाठी केलेले 'निरीक्षण' आणि त्या निरीक्षणं वरून काढलेला 'निष्कर्षहे तीन गुण आत्मसात केले.
खरंतर हा सिद्धांत इथेच संपतो. कारण निसर्गात घडणाऱ्या घटनांचा एकदाचा कारक भाव काढल्यानंतर इतर प्रश्नांचे महत्वच कमी होऊन जाते (किंबहुना ते कमी करण्यात येते). अगदीच उदाहरण घ्यायचे झाले तर 'एखादी घटना का घडते?' या प्रश्नाचे उत्तर जर 'निसर्गाचे नियमन करणाऱ्या शक्तीचीच ती इच्छा आहे.' असे असेल तर त्या घटने संदर्भात इतर प्रश्न गौण ठरतात  आणि विज्ञान युगाचा प्रवास पहिल्याच पायरीवर थांबतो.



पण आपल्या सुदैवाने मानवी इतिहासात अशी काही व्यक्तिमत्वे होऊन गेली कि त्यांनी हा प्रवाह जागृत ठेवला. त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे 'निसर्गाचे नियमन करणाऱ्या शक्तीचीच ती इच्छा आहे.' असे उत्तर देता, निसर्ग, निसर्गाचे नियमन करणारी शक्ती, ज्ञात अज्ञात सजीव निर्जीव आणि स्वतः मनुष्य या सगळ्यांना जोडणाऱ्या दुव्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. ज्याचा परिणाम स्वरूप जटील शास्त्राची  निर्मिति झाली.




आपण आजही या पदपथावर अव्याहतपणे चालत अहोत. या विज्ञानाच्या ऐतिहसिक वाटेवर असंख्य गमतीदार घटना आहेत. ज्या आपण पुढील लेखात पाहूयात.

No comments:

Post a Comment