30 April, 2014

महाराष्ट्र दिन

"आजोबा आजोबा, महाराष्ट्र दिन म्हणजे काय हो?" खांद्यावरचे दप्तर सोफ्यावर फेकत दिनूने आजोबांना प्रश्न केला. हे दिनूचे रोजचेच, शाळेतून आला कि महाराष्ट्र दिनत्याचा प्रश्नांचा भडीमार सुरु व्हायचा. तो काय प्रश्न विचारेल हे सांगता येत नाही. परवाच तो त्याच्या बाबांना विचारात होता "सुर्यास्त होतो म्हणजे; सुर्य डुबतो म्हणजे; आपण नाही का समुद्रात सूर्याला डुबताना पहिले होते तसे तो बॉल पाण्यात डुबतो तसा डुबतो का?"  या त्याच्या वाक्यावर त्याचे बाबा पोट धरून हसले होते. आजही त्याने आल्या आल्या आजोबांकडे मोर्चा वळवला होता "आजोबा, सांगाना  महाराष्ट्र दिन म्हणजे काय?" "का रे बाळ? तू हा प्रश्न का विचारतोयस?" वर्तमान पत्रातील अर्धवट राहिलेले शब्दकोड्यातील रिकाम्या चौकटी भरत आजोबांनी विचारले. "शाळेतल्या अनघा ताईंनी सांगितलाय कि उद्या महाराष्ट्र दिन आहे म्हणून शाळेला सुट्टीये! पण मग महाराष्ट्र दिन म्हणजे काय?"
हातातील वर्तमानपत्राची घडी घालत आजोबा म्हणाले " अरे बाळा, १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची  निर्मिती झाली म्हणून दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो". आजोबा दिनूच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे पाहत होते. ते काही विचारणार तेव्हड्यात दिनूने दुसरा बॉम्ब टाकला "१ मे १९६० ला महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणजे त्या आधी महाराष्ट्रच नव्हता का ?" या त्याच्या प्रश्नावर मात्र घरातले सारेच हसले. "नाही बाळ, तसे नाही महाराष्ट्र त्या आधीही होता अगदी  अश्मयुगात सुद्धा!!" "अश्मयुगात सुद्धा?" शेजारीच बसलेली दिनूची मोठी बहिण प्रिया पुढे सरसावली. "होय" आजोबा म्हणाले, "प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्रात मानवी वस्ती झाली नाही असे पूर्वी समजले जात असे. परंतु संशोधनाद्वारे येथे अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व होते ते सिद्ध झाले आहे. साधारणपणे दोन ते तीन लाख वर्षांपूर्वी आद्य पुराश्मयुगात देशातील इतर ठिकाणांप्रमाणेच महाराष्ट्रातही मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तुला खरे वाटणार नाही, पण त्या काळी गोदावरी, भीमा, वैनगंगा आणि प्रवरा नदीच्या किनारी वीस ते तीस लोकांच्या समूहात हे लोक राहत होते शिकार करत होते  त्यांनी जंगली हत्ती  व बैल  यासारख्या प्राण्यांचीही त्यांनी शिकार केली असावी. कारण या प्राण्याच्या अश्मास्थि नेवासे (जि. अहमदनगर ) व मोठ्या प्रामणात गोदावरीची उपनदी मांजरा हिच्या काठावर वसलेल्या धनेगांव (जि. उस्मानाबाद) येथे सापडल्या. चाळीसगांव ( जि. जळगांव ) जवळील पाटणे येथे सुमारे २५००० वर्षांपूर्वीची म्हणजे साधारणतः मध्य किंवा उत्तर अश्मयुगतील हत्यारे देखील सापडली आहेत.” "पण आजोबा मग महाराष्ट्रात शेतीची सुरवात कधी झाली?" प्रियाने विचारले, "साधारण चार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीची सुरुवात झाली असावी असा अंदाज आहे.
इसवी सनाच्या पूर्वी पासूनच महाराष्ट्रात संस्कृतीची स्थापना होण्यास सुरुवात झाली. ७ व्या शतकाच्या सुमारास भारतात आलेला चीनी प्रवासी  'हून त्स्यांग' यांनी लिहिलेल्या ग्रंथात महाराष्ट्र या नावाचा प्रथम उल्लेख आढळतो. २००० वर्षांपूर्वी महाराष्ट्र हा मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. साधारणतः गौतम बुद्धाच्याच काळात  शूर्पारक या बंदराची स्थापना करण्यात आली होती. सम्राट अशोकच्या काळात सोळा महाजनपदांपैकी एक “अश्मक” हे महाजनपद महाराष्ट्रात (औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यांच्या आसपासचा प्रदेश) भरभराटीला आले होते; तर `तगर (उस्मानाबाद जिल्हयातील `तेर’) हे
नगरराज्य उदयाला आले. त्यानंतर सातवाहन राजांनी महाराष्ट्रावर सुमारे ३०० वर्ष (इ,स,पू. १०० ते इ.स. २३०)  राज्य केले. याच काळात पितळखोरे, अंजिठाAjanta Cave arts  (सुरुवातीची लेणी), भाजे, कार्ले,  नाशिक, जुन्नर इत्यादिंसारखी शेकडो कोरीव लेणी काळ्या पाषाणात खोदली गेली. सातवाहनांपैकी सर्वात थोर राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने इ.स. १२४ मध्ये नहपान याचा पराभव केला. ई.स. ८५० ते १३३४ पर्यंत महाराष्ट्रावर देवगिरीच्या यादव राजाचे अधिपत्य होते. या काळात मराठी  भाषा भरभराटीला आली. आपल्यास ज्ञात असलेले पसायदान याच काळात लिहिले गेले. १४व्या शतकात आलेल्या अल्लाउद्दिन खिलजीने कपटाने राजा रामदेवराय यादव आणि त्याचा पुत्र शंकरदेव यादव यांचा पराभव करून, महाराष्ट्रावरील यादवचे राज्य जिंकून, तुघलक घराण्याची सत्ता प्रस्थापित केली. तीनशे वर्षांच्या  इस्लामिक राजवटीनंतर १७व्या शतकात निजामशहा, आदिलशाह, कुतुबशाह आणि मोघल या साऱ्यांशी एकाकी झुंज देत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना  केली ती याच महाराष्ट्रात. त्यांच्या दैदिप्यमान कर्तुत्वामुळे आजही महाराष्ट्रात राहणाऱ्या किंबहुना भारतात राहणाऱ्या प्रत्येक हृदयात त्यांना ध्रुवासारखे अढळ स्थान प्राप्त आहे.
हे मराठा साम्राज्य महाराष्ट्रावर १८व्या शतकापर्यंत राज्य करीत होते. ई.स. १८१८ मध्ये मराठ्यांचा पाडाव होऊन महाराष्ट्रावर इंग्रजांची (इस्ट इंडिया कंपनीची) सत्ता आली. इंग्रज साम्राज्य विरुद्ध पुकारलेल्या १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघा भारताच्या मुक्ततेसाठी नानासहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांनी सिंहाचा वाटा उचलला. भारताला परदास्याच्या शृंखलांतून विमुक्त करण्यासाठी, राष्ट्राच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, उस्ताद लाव्हाजी वस्ताद, उमाजी नाईक, लोकमान्य टिळक, अनंत कान्हेरे, हॉटसन गोगटे, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ पांडुरंग सदाशिव खानखोजे, सयाजी राजे गायकवाड यांनी आणि या सारख्या असंख्य ज्ञात अज्ञात नारोत्तामांनी आपले आयुष्य अर्पण केले. भारताला स्पृश्यास्पृश्यातेच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी आपले अवघे जीवन व्यतीत करणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या भार्या आणि भारतातील प्रथम महिला अध्यापिका सावित्रीबाई फुले, डॉ बाबा साहेब आंबेडकर, छत्रपती शाहूमहाराज हे सारे महाराष्ट्राचेच. महिला सक्षमीकरणासाठी आजीवन झगडणारे गोपाल आगरकर, धोंडो केशव कर्वे हेही महाराष्ट्राचेच. अशी अजून असंख्य नावे सांगता येतील. कारण हे राज्य केवळ एक भौगोलिक सीमा असलेला जमिनीचा तुकडा नसून हि एक नररत्नांची खाण आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर महाराष्ट्र हा भारताचा खड्ग हस्त आहे, आणि आपल्याला याचा सार्थ अभिमान असला पाहिजे कि आपण याचा भूमीत जन्मलो आहोत." आजोबा बोलता बोलता थांबले.  प्रिया कानात प्राण आणून आजोबांचे शब्द्नशब्द ऐकत होती. छोटा दिनू निशब्द होऊन आजोबांकडे पाहत होता. आजोबांनी सांगितलेल्या नावांपैकी बरीचशी नावे त्याने ऐकलेलीही नव्हती पण त्या नावांच्या उच्चारातच असलेली प्रचंड शक्ती त्याला आजोबांच्या डोळ्यात मात्र दिसत होती.

No comments:

Post a Comment