अगदी
फार जुनी नाही तर साधारण १४० वर्षांपूर्वीची हि कथा आहे. इंग्रजी ध्वजाच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतातील
काही निवडक स्वतंत्र संस्थानांपैकी एका संस्थानातील हि गोष्ट. पुत्रहीन राजाच्या मृत्यूनंतर
राजाचा वारस कोण? या विवंचनेत असणाऱ्या विधवा राणी साहेबांनी तत्कालीन हिंदू राज्य
पद्धती नुसार एक मुल दत्तक घेण्याचा निश्चय केला. तत्कालीन समाजमान्य पद्धत होती, कि योग्य, चुणचुणीत, हुशार आणि मुख्य म्हणजे घराण्याशी पदर जुळणारा असे
एक मुल दत्तक घ्यायचे आणि त्याला राज्यकारभाराचे प्रशिक्षण देऊन भविष्यकाळामध्ये राजा
होण्यासाठी मोठा करायचे. फर्मान सुटले,
सर्वत्र दवंडी पिटली गेली.
राजधानी पासून सुमारे ६०० किलोमीटर दूर नाशिक
जवळच्या कवळाणे गावात या राजघराण्याची एक शाखा होती. दोनवेळच्या खाण्याची भ्रांत,
अतिशय हलकीच्या परिस्थितीत हे कुटुंब आपले
जीवन व्यतीत करत होते. घरात वडील आणि तीन मुले. थोरल्यामुलाचे नाव आनंदराव, मधल्यामुलाचे
नाव गोपाळराव तर धाकट्याचे नाव संपतराव. एके दिवशी अचानक कलेक्टरची माणसे घरी आली.
राजदरबारी उपस्थित राहण्याचा निरोप त्यांना देण्यात आला. ठेवणीतले वस्त्रे घालून ते
आपल्या तीन लहान मुलांसमेत त्या कलेक्टर च्या माणसांबरोबर निघाले. प्रथम ते नाशिकला
आले तिथून कलेक्टर त्यांना घेऊन गेले ते थेट राजधानीतच. रुंद रस्ते, मोठी घरे, भव्य
महाल, डोळे दिपवून टाकणारे हे दृश्य त्या लहान मुलांनी कधीच पहिले नव्हते. श्रीमंतीचे
ओसंडून वाहणारा सभोवताल पाहत, चेहेऱ्यावर भांबावलेल्या मुद्रा घेऊन ते थेट राजाच्या राजदरबारात गेले. दरबारात इतरही
ठिकाणांहून बरीच मुले त्यांच्या पालकांसमवेत आलेली होती. मुख्य व्यासपीठावर राजाचा
सिंहासन सोडून पाच जण बसले होते, सेनापती, कारभारी, दिवाणजी, प्रधानजी आणि मुनीम. मुलांची
निवड करणे हेच त्या मंडळाचे मुख्य काम होते.
आलेल्या मुलांच्या मुलाखती चालू होत्या, मुलांना अनेक प्रश्न विचारले जात होते. पण साधारणतः
कायरे बाळ कोठून आलास? तुझे जेवण झाले का? असे काही सोपे प्रश्न विचारात होते विचारल्या
जाणाऱ्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न मात्र सगळ्याच मुलांना विचारण्यात आला “काय रे बाळ
इथे कशाला आलास?” मात्र काही आई वडील जे आपापल्या मुलांना घेऊन आले होते त्यांनी या
प्रश्नाचा आधीच अंदाज बांधला होता आणि त्यांनी
मुलांना सांगून ठेवले होते किंवा त्या मुलाच्या वयाला साजेसे तो उत्तर देत असे कि जर मी तुम्हाला आवडलो तर मला खूप दूध मिळणार
आहे, तर एखादा म्हणायचा कि मला लाडू खूप आवडतात आणि तुम्हाला जर मी आवडलो तर मला लाडूच्या डोंगरावर बसायला मिळेल. या कावळाणे गावातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना
देखील हाच प्रश्न विचारला. धाकट्या मुलाला विचारले 'काय रे बाळ इथे कशाला आला?' तो
पाळूनच गेला. थोरल्या मुलाला विचारले 'काय रे बाळ इथे कशाला आला? तो खांदे उडवून म्हणाला
"कोण जणू?" (काय माहित). पण मधल्या मुलाला गोपाळला जेव्हा विचारण्यात आले
कि "काय रे बाळ इथे कशाला आलास?" एक पाय पुढे ठेऊन आणि एक हात छातीवर ठेऊन
प्रश्नकर्त्याच्या नजरेत नजर घालून तो म्हणाला कि "राजा व्हायला आलोय". प्रश्नकर्त्यांनी
दुसऱ्या कोणाचीही निवड न करता याच मुलाची निवड केली त्या मुलाला आपण ओळखतो ते महाराज
सयाजीराजे गायकवाड या नावाने.
या "काय रे बाळ इथे कशाला आलास? या प्रश्नाला
खूप छटा आहेत, खूप अर्थ आहे. जीवन आम्हाला प्रत्येक पावलावर विचारात असते कि
"काय रे बाळ इथे कशाला आलास?" इथे कशाला आलास म्हणजे विज्ञान शाखेत कशाला
आलास, वाणिज्य शाखेत का आलास? कला शाखेत का आलास? "काय रे बाळ इथे कशाला आलास?
म्हणजे या कॉलेजला कशाला आलास हे आहे. पण या प्रश्नांची रेष ही जन्माला कशाला आलास
इथपर्यंत ही जाते. आणि आम्ही हा प्रश्न ऐकल्या वर कमालीचे गोंधळून जातो बऱ्याच वेळेला
हा प्रश्न ऐकल्यावर आम्ही परिस्थितीला घाबरून पळून जातो किंवा अजाण बालकापरी आम्ही
म्हणतो कि मला दूध हवाय म्हणून, मला लाडू हवाय म्हणून किंवा फार तर खांदे उडवून उत्तर देतो कोण जणू? जीवनाच्या
नजरेला नजर भिडवून बेरडपणे उत्तर द्यायला हवे कि राजा व्हायला आलोय.
No comments:
Post a Comment